चोपडा (प्रतिनिधी) आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नुकतेच आझाद मैदानात आरोग्यविभागात काम करणाऱ्या विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन निदर्शने केली. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आशा सेविकांच्या शिष्टमंडळाला चार दिवसांत मानधन वाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, राज्य शासनाला १७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून प्रस्तावावर शिक्कामोर्तब न झाल्यास विधीमंडळाचे अधिवेशन काळात राज्यव्यापी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 19 जून रोजी जिल्हा पातळीवर जेलभरोचा ईशारा देण्यात आला आहे.
जेलभरो आंदोलनात आयटक, सिटू, आरोग्य कर्मचारी महासंघ आदी संघटनांनी भाग घेतला होता. या बाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात ६९ हजार आशा व साडेतीन हजार गटप्रवर्तक महिला आहेत. आशा सेविकांना नियमित स्वरूपाचे निश्चित मानधन मिळत नाही. आशा व गट प्रवर्तक यांना प्रत्येक महिन्याला निश्चित वेतन व कामावर आधारित सध्याच्या मोबदल्यात किमान तिप्पट वाढ व्हायला हवी. 16 हजार जागा रिक्त असून शहरी भागात गटप्रवर्तक भरलेल्या नाहीत. ग्रामीण भागात कार्यरत गटप्रवर्तक यांचे कडून जास्तीचे काम करवूप घेतले जाते.
आशांना दर्जेदार औषधी किट मिळावी मधूमेह, बीपी टेस्टींगची साधने मिळावीत.आंध्र प्रदेशच्या धर्तीवर किमान दहा हजार रुपये मानधन मिळावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या बाबत राज्यमंत्र्याना निवेदन सादर केले असता त्यात नमूद केले आहे की, अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आशा व गट प्रवर्तक महिलांच्या दरमहा निश्चित वेतन व मानधन वाढीबाबत पावसाळी अधिवेशनाआधी तातडीने कार्यवाही व्हावी, तसेच सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवा मोफत करण्याचा निर्णय घेऊन दुष्काळाने त्रस्त जनतेला दिलासा द्यावा. आरोग्य क्षेत्रातील १६ हजार रिक्तपदे त्वरित भरावीत. परिचारिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी विशेष परिचर्या संचालनालय स्थापन करावे, अशा काही प्रमुख मागण्यांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मत संघटनेचे राजू देसले, शंकर पुजारी, सुमन पुजारी, कॉ एम ए पाटील, सलीम पटेल, भगवान देशमुख, विनोद झोडगेडॉ. अभिजीत मोरे यांनी व्यक्त केली.
आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे, सचिव दिलीप उटाने यांनी पाठींबा दिला.राज्य आयटक प्रणीत संघटनेचा ईशारा आंदोलना नंतर आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटनाची मीटिंग झाली. 19 जून रोजी राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 31 ऑक्टोबर रोजी आयटक च्या 100 वर्ष पूर्ती वर्ष निमित्ताने होणाऱ्या मुंबई महारॅली त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस कॉम्रेड सुमन पुजारी, विनोद झॊडगे, अॅड.सुधीर टोकेकर, मंगला लोखंडे, अमृत महाजन, वैशाली खंदारे आदी उपस्थित होते.