आशादीप वसतिगृहातील घटनांवरून मुनगंटीवार विधानसभेत संतापले

जळगाव : प्रतिनिधी । ।  शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून आक्रमक होत भाजपा आमदार सुधीर मुमगंटीवार यांनी आज राज्य सरकारचे वाभाडे काढले

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. यात पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील काही पुरुष सहभागी असल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत.  अधिवेशनात  सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झालेली पहायला मिळाली. भाजपा आमदार सुधीर मुमगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असता यावरुन सत्ताधारी आमदारांनी आक्षेप नोंदवला.

“सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढं एक सेकंद नजरेत आणा…तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. उत्तरात सांगितलं पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो…पण म्हणतात नोंद घेतो…हे पाप फेडावं लागेल. आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो,” अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला.

“जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेण्याचं काम सुरु आहे. व्हिडीओ तसंच इतर सर्व माहिती एकत्र केला जात असून जबाबही नोंदवले जात आहेत. याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दोन दिवसांत कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

अनिल देशमुख यांच्या उत्तरानंतर सुधीर मुंनगंटीवार संतापले आणि १५ हजार खर्च करुनही पोलीस यंत्रणा माहितीच घेत नसेल तर हे सरकार कशासाठी आहे ? अशी विचारणा करत राष्ट्रपती राजवट लावावी लागेल असं म्हटलं. या सरकारवर राष्ट्रपती राजवट आणायची वेळ आली आहे असंही ते म्हणाले. “मी संविधानाचा सन्मान करणारा व्यक्ती आहे. पण तुम्ही १०१ पापं केलीत, त्यामुळे आता राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही असंच वाटू लागलं आहे. कारण जर आमच्या आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग आहे,” असा संताप मुनगंटीवारांनी व्यक्त केला आहे.

“सुधीर मुनगंटीवार धमक्या देत आहेत. निवडून आलेलं सरकार बहुमताच्या जोरावर चालत आहे. काम करत असताना आता राष्ट्रपती राजवट लागेल अशी धमकी देणं योग्य नाही. असं भाष्य करु नये अशी समज त्यांना दिली जावी,” अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यावेळी केली.

Protected Content