जळगाव (प्रतिनिधी) आर्थिक वर्ष 30 जूनपर्यंत वाढविण्यात आल्याची बातमी खोटी असून चालू आर्थिक वर्षाशी निगडीत देयके 27 मार्च पर्यंतच सादर करावीत, अशी सूचना प्रशासनाने जारी केली आहे.
वित्त विभागाच्या 13 मार्च रोजीच्या परिपत्रकानुसार आर्थिक वर्ष 2019-2020 अखेर करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि, राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संक्रमणामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीत राज्य शासनाने कार्यालयीन उपस्थिती 5 टक्के एवढी ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या पार्श्वभुमिवर चालु आर्थिक वर्षअखेर कोषागाराचे नियमन करण्याच्यादृष्टीने सर्व जिल्हा कोषागारे/उपकोषागारे व अधिदान तसेच लेखा कार्यालये, मुंबई येथे चालु आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडीत देयके स्विकृती केवळ 27 मार्च, 2020 पर्यंतच स्विकारणे सुरू ठेवण्याबाबत वित्त विभागाने निर्देश दिलेले आहेत.
सर्व जिल्हा कोषागारे/उपकोषागारे व अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे दिनांक 27 मार्च, 2020 पर्यंतच चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडीत देयके स्विकारण्यात यावीत. त्यानंतर केवळ कोरोना आजाराशी निगडीत बाबींची देयके वगळता अन्य कोणत्याही प्रकारची देयके स्विकृत करण्यात येणार नाहीत. अलिकडेच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सन 2019-2020 हे आर्थिक वर्ष 30 जून, 2020 पर्यंत वाढविण्यात आले असल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. तथापि, अशा बातम्यांवर विश्वास न ठेवता चालु आर्थिक वर्ष हे नियमितपणे 31 मार्च 2020 रोजीच संपत असून 1 एप्रिल 2020 पासून पुढील आर्थिक वर्ष सूरू राहणार आहे. अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि जिल्हा कोषागारे व उपकोषागारे यांनी त्यांच्या अधिनिस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी याची नोंद घ्यावी, असे संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.