नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीत शनिवारी रात्री शेतकरी आंदोलनस्थळी पकडलेल्या आरोपीनं चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. मात्र, त्याच व्यक्तीचा नवा व्हिडीओ समोर आला असून, शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे माध्यमांशी बोललो, असा यू-टर्न आरोपीनं घेतला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट असल्याचा हा खळबळजनक प्रकार उजेडात आला होता. आंदोलन सुरू असलेल्या परिसरात पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली होती. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे, असं आरोपीनं म्हटलं होतं. मात्र, आता त्यानं आपल्या विधानांवरून यू-टर्न घेतला आहे.
त्याचा नवा व्हिडीओ समोर आला असून, त्यांचं नाव योगेश आहे. त्याचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला असून, आपण शेतकऱ्यांनी जे बोलायला सांगितलं होतं. तेच बोललो. मात्र, हा व्हिडीओ अधिकृत असल्याचं अद्याप निष्पन्न झालेलं नाही. या तरुणाला सोनीपत पोलिसांनी अटक केलेली आहे.
आरोपीनं संपूर्ण कटाचाही उलगडा केला होता. “आमचे दोन गट तयार केले होते. १९ जानेवारीपासून आंदोलनस्थळी आहे. शेतकरी सोबत शस्त्र बाळगतात का यांचा शोध घेण्याचं काम दिलं होतं,” असं आरोपीनं सांगितलं होतं. “२६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांना रोखण्यात येईल. त्यानंतर शेतकरी थांबले नाहीत. तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश होते. तर दुसरीकडे दहा जणांचा एक गट आहे. हा गट शेतकऱ्यांच्या रॅलीत सहभागी होऊन पाठीमागून गोळीबार करतील. जेणेकरून आंदोलक घाबरून पांगतील. त्याचबरोबर व्यासपीठावर जे चार लोक असतील, त्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे. त्यांचे फोटो देण्यात आलेले आहे. ज्यानं आम्हाला हे सांगितलं, तो पोलीस आहे. त्याचं नाव प्रदीप सिंह आहे. राई ठाण्यात आहे. तो नेहमी चेहरा झाकून भेटायला यायचा,” अशी माहिती आरोपीनं दिली होती.