आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून पुन्हा लॉकडाउनचे सूतोवाच

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असून पुन्हा लॉकडाउन लागणार का ? हा प्रश्न सामान्यांना सतावत आहे.

आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं म्हटलं आहे

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असं म्हटलं आहे.

 

“स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावर कोरोना नियंत्रित करण्यासाठी ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या त्यांनी कराव्यात अशी सूचना आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे या उपाययोजना केल्या जातील. मात्र लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज लागेल त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

 

पुढे ते म्हणाले की, “फार मोठी संख्या वाढली आहे अशातला भाग नाही. जरुर चार पाचशेंनी वाढते, परत दोन तीनशेंनी कमी होते. त्यामुळे दररोज अडीच तीन हजाराने रुग्ण वाढण्याचं प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून आहे. पण प्रभाव आता कमी झाला आहे. किरकोळ स्वरुपात वाढला आहे, नाही असं नाही. आज फक्त ३६०० आहेत, कालच्या तुलनेत कमी झालेत. त्यामुळे चिंता करण्याचा विषय नाही. पण काळजी जरुर घेतली पाहिजे”.

 

“जिथे खूप गर्दी असते तिथे सातत्याने चाचणी करणं, अधिक कठोर पद्धतीने नियमांचं पालन करणं महत्वाचा विषय वाटतो,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. “मुंबई लोकलचा दुसरा टप्पा सुरु झाल्यामुळे रुग्ण वाढलेत अशातला भाग नाही. मुंबईच्या आयुक्तांनीही फार वाढ झालेली नाही आणि होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी खात्री दिली आहे. पण आपल्याला काटेकोरपणे नियमांचं पालन करावं लागेलच,” यावर राजेश टोपे यांनी जोर दिला.

 

 

 

कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

 

कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. निर्बंध शिथिल केले त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत. सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा. ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे.गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा., अशा सूचना देण्यात आल्या आहेत

Protected Content