वॉशिंग्टन वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी विविध पातळींवर संशोधन सुरू आहे. आयोडीनने नाक आणि तोंड धुऊन घेतल्यास सर्गापासून बचाव करता येऊ शकतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने असे दावे यापूर्वीच फेटाळले आहेत. मात्र, अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.
आयोडीनने नाक धुतल्यास या विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या एक नमुन्यावर तीन वेगवेगळ्या सांद्रतेचे (Concentrations) एंटीसेप्टिक पोविडोन-आयोडीन (पीवीपी- I)चे द्रावण टाकले. पोव्हिडोन-आयोडीन ०.५ टक्के सांद्रतेच्या द्रावणात हा विषाणू निष्क्रिय करण्यासाठी फक्त १५ सेकंदाचा कालावधी लागला. त्यानंतर, संशोधकांनी नाक आणि तोंड आयोडीनने धुतले तर संसर्ग टाळता येऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
विषाणूला निष्क्रिय करता येत असल्यामुळे विषाणू फुफ्फुसापर्यंत जाऊन संसर्ग वाढण्याचा धोका कमी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. हा उपाय बाधितांच्या संख्येला अटकाक करण्यासाठी वापरता येऊ शकतो असा संशोधकांचा दावा आहे. मात्र, हा प्रयोग घरी न करण्याचेही आवाहन संशोधकांनी केले आहे. नाकाची स्वच्छता ही डॉक्टरांच्या देखरेखी खाली चांगल्या पद्धतीने होऊ शकते, त्यामुळे घरी आयोडीनचा वापर न करण्याचे आवाहन संशोधकांनी केले आहे.
या संसर्गाने अमेरिकेत थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत करोनाचा मुद्दा प्रमुख आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या तीन-चार आठवड्यात लस मिळणार असल्याचे वक्तव्य केले आहे. लॉकडाउनमुळे आम्ही जवळपास २५ लाखांहून अधिक अमेरिकन नागरिकांचे प्राण वाचवले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.