जळगाव, प्रतिनिधी । सीसीआयएमच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात ५८ अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. आयएमएतर्फे या विरोधात ११ डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारला असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचने विरुध्द आय.एम.ए.ने राष्ट्रीय पातळीवर हे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या २१९ शाखांमधील ४५००० डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पंजीकृत असलेले एकूण १,१०,००० डॉक्टर्स सहभागी होतील.
यामध्ये सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. आय.एम.एच्या वतीने सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या ४ समित्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत. वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल यावर सरकारने भर द्यावा आदी मागण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे.