आयसीसी आता दर महिन्याला पुरस्कार देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जानेवारी २०२१पासून आयसीसीतर्फे दर महिन्याला एक नवीन पुरस्कार देण्यात येणार आहे. महिन्यातील सर्वोत्तम पुरूष व स्त्री क्रिकेटपटूचा सन्मान या पुरस्काराअंतर्गत करण्यात येणार आहे. .

२०२० हे वर्ष क्रिकेटसाठी फारसं चांगलं नव्हतं. सुमारे पाच ते सहा महिने करोनामुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प होतं. पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकादेखील स्थगित करण्यात आल्या होत्या. वर्षाच्या अखेरीस हळूहळू क्रिकेटने पुन्हा जोर धरला. आता करोनासंदर्भातील नव्या नियमांनुसार क्रिकेट मालिका खेळल्या जात आहेत. तशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने देखील क्रिकेटपटूंसाठी एक नवा पुरस्कार सुरू केला आहे.

 

या पुरस्कारासाठी चाहत्यांनाही नामांकन मिळणाऱ्या खेळाडूंना मत देता येणार आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या विविध क्रिकेट मालिकांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघातील काही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, जो रूट यांसारखे खेळाडू या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत. आता पुरस्कारासाठी नामांकन कोणाला मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आयसीसीकडून दर महिन्याला पुरूष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील ३ सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नामांकनं दिली जातील. खेळाडूचा मैदानावरील पराक्रम, वावर आणि महिन्यात केलेले विक्रम या साऱ्याचा विचार करून हे तीन खेळाडू नामांकित केली जातील. एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी आयसीसी च्या मतदान अकादमीकडे ९० टक्के तर चाहत्यांकडे १० टक्के मतदानाचे अधिकार असतील. आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर चाहत्यांना आपलं मत नोंदवता येणार आहे. विजेत्या खेळाडूंची नावं दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जाहीर केली जातील.

Protected Content