नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था । आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी विवो इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले. दोन वर्षानंतर आयपीएल भारतात परतणार आहे. अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत.
९ एप्रिल २०२१ रोजी चेन्नई येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर प्ले ऑफचे तसेच ३० मे २०२१ रोजी अंतिम फेरीचे आयोजन केले जाईल.
प्रत्येक संघ लीगच्या टप्प्यात चार ठिकाणी सामना खेळेल. ५६ लीग सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरू येथे प्रत्येकी १० सामने तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने खेळले जातील. यंदाच्या आयपीएलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही. लीगच्या टप्प्यात सर्व संघ ६ पैकी ४ ठिकाणी खेळतील.
गेल्या वर्षी युएईमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळून यशस्वीरित्या स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर, बीसीसीआयला आत्मविश्वास आहे की खेळाडूंचे तसेच त्यामध्ये सहभागी होण्याऱ्या इतर सर्व लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेवून या आयपीएलचे आयोजन केले जाईल.