गुलबर्गा । ”आम्ही संख्येने १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी पडू” असे वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत असलेल्या शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम महिलांनी ठिय्या दिला आहे. यावरुन एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेले एक विधान वादग्रस्त ठरले आहे. पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केलं. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते म्हणतात की, ”आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा”, असे ते म्हणाले आहेत.
वारीस पठाण हे एमआयएमचे भायखळा मतदारसंघातील माजी आमदार असून आता त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडालेली आहे. यावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, पठाण यांनी जनतेला आव्हान देऊ नये. त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. तर शिवसेनेनेही या पठाण यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, वारीस पठाण यांच्या वक्तव्याचे सोशल मीडियातही तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे.