मुंबई (वृत्तसंस्था) मनसेने जो झेंडा घेतला आहे, त्यामध्ये हरकत घेण्यासारखे काही वाटत नाही. आमचे मित्रपक्ष झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो घेऊन फिरतात. मनसेने फक्त झेंड्याची काळजी घ्यावी. आम्हा दोघांमध्ये एकवाक्यता झाली, तर एकत्र येऊ शकतो, लोकांना ते आवडेल, म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मनसे-भाजप युतीचे संकेत दिले आहेत. भविष्यात काहीही अशक्य नसल्याचंही महाजन यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. महाजन म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विषम विचारी पक्ष एकत्र येत असतील, मग आम्ही तर समविचारी आहोत. काही बाबतीत मतभेद असले, तरी भविष्यात मतं जुळली तर काहीही अशक्य नाही. दोघांमध्ये एकवाक्यता झाली, तर एकत्र येऊ शकतो, लोकांना ते आवडेल. मनसे आणि भाजप एकाच मताचे आहेत, काहीही अशक्य नाही, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.