अमळनेर प्रतिनिधी | खान्देशचा आवाज विधानसभेत गरजविण्याची परंपरा काहीं जेष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी सुरू केली असताना तीच परंपरा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी कायम राखत यंदाच्या हिवाळी अधिवेशनात भाषणातून मुद्देसूदपणे अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर हात घातल्याने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम वक्तृत्व असलेले आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
प्रत्यक्षात आमदार अनिल पाटील यांची ही पहिलीच टर्म असून त्यातही दीड ते दोन वर्षे कोविड कालावधीमुळे विधानसभेतील सभागृहाचा अनुभव ते घेऊ शकले नसताना ही केवळ अभ्यासू वृत्तीमुळे या अधिवेशनात अतिशय धाडसाने विविध चर्चा दरम्यान तीन उत्तम भाषणे करून त्यांनी आपली राजकीय परिपक्वता सिद्ध केली. त्यांनी आपल्या भाषणात पाडळसरे धरण, नगरपरिषद प्रभाग रचना, वाळू प्रश्न, क्रीडा संकुल निधी, शिक्षक पेन्शन, अवकाळी अनुदान, आयटीआय ट्रेड, अल्पसंख्याक निधी या महत्वपूर्ण विषयांवर मुद्देसूदपणे बोलून संपूर्ण सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले, विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून आधीच त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असताना आता या भाषणामुळे अधिकच प्रकाशझोतात ते आले आहेत.
प्रभागरचनेबाबत मांडली परखड बाजू
पहिल्या दिवशी नगरविकास विभागाच्या बीलावर भाषण करताना दोन सदस्यीय प्रभाग केल्याबद्दल शासनाचे विशेष अभिनंदन करत प्रभावीपणे बाजूही त्यांनी मांडली, प्रभाग रचना करताना 2011 च्या जनगणनेनुसार 300 ते 400 लोकसंख्येचे ब्लॉक तयार केले जातात, मात्र काही ठिकाणी लोकसंख्या पूर्ण झाल्यास तो ब्लॉक तोडून दुसऱ्या प्रभागास जोडला जातो, असे केल्याने त्या लोकांची दुसऱ्या प्रभागाशी कनेक्टिव्हिटी राहत नाही. यामुळे तेवढा भाग विकासापासून वंचित राहतो. प्रत्यक्षात नवीन अधिकारी अनभिज्ञ असल्याने असे प्रकार होत असतात त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीशी चर्चा होऊन प्रभाग रचना झाली पाहिजे. तसेच चार प्रभाग असताना त्याची लांबी व व्याप्ती जास्त असल्याने नगरसेवक बाजू झटकत होते. आता प्रभाग लघु व दोन सदस्यीय केल्याने नगरसेवक व जनता दोघांच्याही दृष्टीने सोईचे झाले असून यासाठी शासनाचे अभिनंदन केले पाहिजे अशी भूमिका अनिल पाटलांनी मांडली.
पुरवणी मागण्यांवर चर्चेचे गाजले भाषण
पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना आ. अनिल पाटील यांनी प्रश्न मांडला की, राज्यासह जिल्हा व अमळनेर तालुक्यात वाळू प्रश्न ऐरणीवर आला असताना वाळूचे घाट अजून का लिलाव होत नाहीत? यामुळे विकास कामे थांबली असून लोकांना घर बांधणे अडचणीचे झाले आहे, जे लोक हा व्यवसाय करीत असतील त्यांनाही प्रशासनाकडून प्रचंड त्रास असून अनेक वाहने महसूल कडे ढिगाऱ्याने पडली आहेत, परिणामी हे व्यावसायिक लोक वाम मार्गाकडे जाऊ लागली आहेत यासाठी वाळू घाट लिलाल लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. क्रीडा विभागावर बोलताना ते म्हणाले की शासनाने क्रीडा संकुलाना मंजुरी दिली असली तरी कमी निधी मुळे खेळाडूंची संख्या सोइ सुविधे अभावी घटत चालली आहे,तरी निधीची मर्यादा पाच कोटी करावी अशी मागणी त्यांनी या विभागाकडे केली.तसेच शालेय शिक्षणाच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की 2005 पूर्वी जे शिक्षक लागले त्यांना शासनाच्या दिरंगाई मुळे अनुदान 2005 नंतर आले म्हणून पेन्शन पासून वंचित ठेवण्यात आले आहे, तरी अश्याना नैसर्गिक न्याय तत्वाच्या आधारावर जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.मदत व पुर्नवसन विभागाबाबत बोलताना सप्टेंबर 2019 मध्ये अमळनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील 32 गावांना मदतीचे अनुदान अजूनही मिळाले नाही,तरी जे वंचित आहेत त्यांना न्याय द्यावा असा आग्रह या विभागाला त्यांनी धरला.तसेच जलसंपदा विभागाबाबत अर्थमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांनी पाडळसरे धरणासाठी 135 कोटी निधीची उपलब्धता करून दिली मात्र डिझाइन नुसार काम करताना काही तांत्रिक अडचणी मुळे पिलर चे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही यासाठी या विभागाची तात्काळ मिटिंग लावून हा प्रश्न सोडवावा जेणेकरून धरणाचे काम गतीने सुरू होईल अशी आग्रही मागणी त्यांनी केली. किमान कौशल्य विभागाकडे मागणी करताना पण ज्या आयटीआय च्या ज्या ट्रेड मध्ये विद्यार्थ्यांची जास्त शिकण्याची मागणी असेल त्या ट्रेडला अमळनेर शासकीय आयटीआय सह सर्वत्र मान्यता द्यावी व विद्यार्थ्यांची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली. शेवटी अल्पसंख्याक विभागाचे अमळनेर शहराकडे लक्ष वेधून अल्पसंख्याक लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी या विभागाचे मंत्री ना नवाब मलिक यांच्याकडे केली.
प्रभावी काऊंटर अटँक करण्यातही यशस्वी ठरले आ.अनिल पाटील
अधिवेशनात विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात येत असतो, यात विरोधी पक्ष्याचे नेते शासनाविरोधात बाजू मांडून टीका टिपण्णी करीत असतात. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या वतीने काऊंटर अटँक करून शासनाची बाजू मांडत एकप्रकारे विरोधी पक्षास उत्तर दिले जात असते. यासाठी अनुभवी व जेष्ठ आमदारांची शक्यतोवर निवड होते. मात्र या हिवाळी अधिवेशनात आ.अनिल पाटील यांची प्रभावी शैली पाहून सरकारची बाजू मांडण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी विरोधी पक्षाचे जेष्ठ नेते आ सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणावर प्रभावी असा काऊंटर अटँक करीत सरकारची मुद्देसूदपणे व प्रभावी बाजू मांडली. हे करीत विरोधी पक्ष्याने केलेल्या चुकाही त्यांनी लक्षात आणून देत रोखठोक उत्तर दिले. ज्याप्रमाणे खान्देशात पूर्वीचे काही नेते राज्यस्तरीय मुद्दे मांडण्यात प्रभावी होते तीच शैली आणि तोच कणखरपणा आ.अनिल पाटील यांच्यात दिसून आल्याने सभागृहात उपस्थित सर्व जेष्ठ मंत्री आणि आमदार महोदयांनी आ.पाटलांचे तोंडभरून कौतुक केले.