कोल्हापूर, वृत्तसंस्था । लोकसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलंय ‘अशी कोल्हापुरातील घोषणा राज्यभर चर्चेला आली होती तोच शब्द घेत आता ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ या नावाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला असून त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वादात महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत मदत न करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. दोघेही एका आघाडीत असतानाही मदत न करता शिवसेनेला ‘हात ‘ देताना पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ असं वाक्य वापरत आपली रणनिती जाहीर केली. त्यानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी ऐवजी शिवसेनेला मदत करत प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार होण्यास हातभार लावला.
लोकसभा निवडणूक काळात या शब्दाची फारच चर्चा झाली. नंतर विधानसभेतही हात शब्द केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर चर्चेला आला. या सर्व पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांचे कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी आमचं ठरलंय विकास आघाडी या नावाने एक पक्ष स्थापन केला. त्याच्या नोंदणीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. निवडणूक आयोगाने यावर हरकती मागवल्या होत्या. तीन महिन्यात एकही हरकत न आल्यामुळे अखेर या पक्षाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत हा पक्ष सलामी देण्याची शक्यता आहे.