आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरात विद्यार्थ्यांना दिले आपत्तींचे प्रशिक्षण धडे !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पूराच्या आपत्तीतील बचाव कार्यात कोणताही खर्च न करता प्रसंगावधान राखत तराफा सारखी उपकरणे तयार करून जिवीतहानी कशी टाळता येईल याची शास्त्रशुध्द प्रात्याक्षिके एनडीआरएफच्या प्रशिक्षकांनी मेहरूण तलावावर बुधवारी दाखवली तेव्हा येणा-या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास सज्ज असल्याचा भाव रासेयो स्वयंसेवकांच्या चेह-यावर दिसून आला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सोमवारपासून राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर सुरू झाले आहे. राज्याच्या २० विद्यापीठांमधील ८५६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. एनडीआरएफच्या ५० तज्ज्ञाकडून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. शिबिराच्या तिस-या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या ठिकाणी या तज्ज्ञानी पूर बचाव यंत्रेणे बाबतची माहिती दिली व प्रात्यक्षिके दाखवली. आयआरबी बोट व ओबीएम यांच्या हाताळण्याचा परिचय, पूर बचाव तंत्र आणि सुधारित तराफा उपकरणे आणि पोहण्याचे तंत्र व साधनांचा वापर अशा काही विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली व शंकाचे निरसन केले. टाकऊ वस्तूंपासून जसे की, पाण्याच्या बाटल्या, थर्माकॉल, कॅन, बॅरल, टयूब, बांबू यापासून कशा प्रकारचे तराफे तयार करून पूराच्यावेळी बचाव कार्यात या उपकरणांचा साहाय्याने जिवीतहानी टाळता येते याविषयी माहिती सांगितली तसेच पाण्याच्या तळाशी उतरून कसा बचाव करता येतो याचे प्रात्याक्षिक दाखविले. टाकाऊ वस्तूपासून उपकरणे विद्यार्थ्यांना तयार करायला लावली. याशिवाय रबराची नाव कशी तयार होते. बचाव कार्यात या बोटीचा प्रभावी वापर कसा करता येतो हे सांगताना त्यांची तांत्रिक माहिती देखील दिली. पोहतांना कोणती काळजी घ्यावी, शरीराची हालचाल कशी हवी आणि त्यासाठी मुलभूत कौशल्य कोणते असावे याविषयी एनडीआरएफच्या प्रशिक्षकांनी माहिती दिली.

निरीक्षक सुशांतकुमार शेट्टी, सहायक उपनिरीक्षक विजय म्हस्के, प्रशिक्षक वैभव शेडोळे, निलेश जाधव, अभय येवले, सुशिल अस्वले, सागर चव्हाण, वैभव राऊत, अभिजित कुसपे, लालचंद भोसले, देविदास गीते, योगेश थोरात, सभा नारायण, योगेंद्र चौधरी, मच्छिंद्र माने, मध्यवाळ डिके यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मेहरूण तलावावर कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे, समन्वयक डॉ. किशोर पवार, डॉ. नितीन तेंडूलकर, प्रा. समीर नारखेडे, डॉ. प्रविण रोकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी मेहरूण तलावावर हे प्रशिक्षण घेतले उद्या देखील मेहरूण तलावावर प्रात्याक्षिक होणार आहेत.

विद्यापीठातील पाच सभागृहांमध्ये सकाळी ९ ते ५:३० या कालावधीत ह्रदयविकाराचा त्रास उदभवल्यास सीपीआर कसा दिला जातो याची माहिती देण्यात आली. लालचंद भोसले, अभिजीत खुपसे, दादा कदम, वैभव शेडोळे, देविदास गीते, सुशिल अस्वले यांनी ही माहिती दिली.

बुधवारी सकाळी विद्यापीठाच्या क्रिडा मैदानावर कवायत आणि योगा घेण्यात आले त्यानंतर “रस्ते सुरक्षा” या विषयावर जळगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रस्त्यावर वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी या विषयांशी निगडीत त्यांनी काही प्रश्ने विद्यार्थ्यांना विचारली आणि योग्य उत्तर देणा-या विद्यार्थ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पारितोषिक स्वरूपात हेल्मेट देण्यात आले. श्याम लोही यांच्या समवेत परिवहन कार्यालयाचे नवनीत वळवी, घनश्याम चव्हाण, निखिल गायकवाड, विशाल बटूळे आदी अधिकारी देखील उपस्थित होते. सायंकाळी विद्यापीठ प्रशासकीय इमारतीसमोर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, नंदूरबार, नांदेड, अमरावती, वर्धा, दापोली आणि लोणारे या जिल्ह्रयातील विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयाला अनुसरून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यावेळी उपस्थित होते.

Protected Content