मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तांबे पिता-पुत्राने कॉंग्रेसला तोंडघशी पाडले असतांनाच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसने दिलेली उमेदवारी नाकारत आपले पुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे कॉंग्रेससह महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात गोची झालेली आहे. या प्रकरणात आता तांबे पिता व पुत्राच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष कारवाई करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी देखील याबाबत भाष्य केले आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले की, दोन दिवसांपासून काहीतरी वेगळेच कानावर येत होते. त्यामुळे मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. काहीतरी वेगळं शिजत आहे, माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितले होते. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशी पूर्णपणे सांगितले होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू. डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असे मला सांगितले होते, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.