आनंद महिंद्रांबाबतच्या विधानावरून मनसेनं मुख्यमंत्र्यांना सुनावलं

 

 मुंबई : वृत्तसंस्था ।  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला व  उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटवरून त्यांचं नाव न घेता सुनावलं. यावर महिंद्रा यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नसली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्यमंत्र्यांवर आगपाखड करण्यात आली आहे.

 

यावेळी येत्या १ ते २ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञांनी चर्चा करून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्याचे देखील सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. होते

 

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शनिवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावणं कसं चुकीचं ठरू शकतं याविषयी देखील त्यांनी मत मांडलं. तसेच, उद्योगपतींच्या सल्ल्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा समाचार घेतला. “मुख्यमंत्री म्हणाले की आरोग्य सुविधा उभारण्याचे सल्ले दिले, आम्ही त्यावर काम करतोच आहोत. पण आरोग्य सेवक, रोज ५० डॉक्टरांची सोय व्हावी वगैरे. कोरोनाकाळात असे आरोग्यसेवक स्वत:हून सरकारला मदत करण्यासाठी आले होते. पण प्रादुर्भाव कमी होताच सरकारने त्या लोकांना कामावरून काढून टाकलं. त्यामुळे पुन्हा ते कामावर आले, तर सरकार त्यांना काढून टाकणार नाही, याची काय खात्री आहे? लोकांच्या मनातली तुमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे, म्हणून तुम्हाला डॉक्टर, आरोग्यसेवक मिळत नाहीत”, असं संदीप देशपांडे या लाईव्हमध्ये म्हणाले.

 

“मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितलं, त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच. पण कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण नुसरं फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल नाहीत”, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

 

महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट करून लॉकडाऊनवर प्रश्न उपस्थित केला होता. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं.

 

यावेळी संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर देखील खोचक टीका केली. “कोरोना गंभीर होत असताना लॉकडाऊन वाढवायचा नाही, तर काय करायचं? असा उलट प्रश्न मुख्यमंत्र्यांनी जनतेलाच विचारला आहे. शिवाय यावर ते आता तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. खरंतर इतक्या संभ्रमित अवस्थेतला मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिला नाही”, असं देशपांडे यावेळी म्हणाले. तसेच, “मुख्यमंत्र्यांनी केलेला संवाद होता की जनतेला धमक्या होत्या?” असा सवाल देखील देशपांडेंनी उपस्थित केला आहे.

Protected Content