बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विवाहासाठी धर्मांतर केलेल्या परळी येथील युवकाने आपल्याला आमीष दाखवून फसविण्यात आले असून आपण हिंदू धर्मातच असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. याआधी युपीतील धर्मांतरणाचे धागेदोरे हे बीडपर्यंत पोहचल्याचे निष्पन्न झाले असतांना आता हा प्रकार घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील मांडवा गावात ३५ वर्षे वयाच्या ज्ञानेश्वर नागरगोजे याने लग्नाच्या प्रलोभनापोटी तरुणाने हिंदू ते मुस्लीम आणि पुन्हा मुस्लीम ते हिंदू असे धर्मांतर केल्याचे समोर आले आहे. प्रारंभी ११ फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्वरने मुस्लीम धर्मात प्रवेश करत असल्याचं बॉंड पेपरवरुन लिहून दिले. त्यानंतर लगेच सहा दिवसांनी म्हणजेच १७ फेब्रुवारीला लग्न-पैशाचे आमिष दाखवून धर्म बदलायला लावला, असा दुसरा नोटरी केलेला बॉंड समोर आला.
याआधी यूपीतील धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन बीडमध्ये असल्याची धक्कादायक माहिती गेल्या वर्षी समोर आली होती. इरफान खान नावाच्या तरुणाला अवैध धर्मांतर प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतले होते. इरफान मूळ बीडमधील परळी तालुक्यातील रहिवासी आहे. यानंतर आता बीडच्या परळी तालुक्यातील तरूणाने पैसे आणि विवाहाचे आमीष दाखवून धर्मांतरास भाग पाडल्याचे प्रतिज्ञापत्र तयार करून दिल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे.