मुक्ताईनगर पंकज कपले | कोरोना वैश्विक महामारीने गेले १७ महिन्यापासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी मुक्ताईनगर जुने मंदीर आज पहाटे ७ वा. शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार योगायोगाने संत मुक्ताबाई जयंती दिनी नवरात्रौत्सव घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांना प्रदिर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष गाभाऱ्यात जावून पदस्पर्श दर्शन घेता आले. त्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. दिवसभर मंदीर परिसर कित्येक दिवसांनंतर भाविकांनी गजबजून गेला होता. दुकानदारांची प्रसाद व फराळाची बऱ्यापैकी विक्री झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. तत्पूर्वी आज पहाटे आदिशक्ती मुक्ताबाईस मानाची अभिषेक पुजा आरती संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी केली .ह्यावेळी पुजारी विनायक व्यवहारे, व्यवस्थापक उद्धव जुनारे, रविंद्र महाराज हरणे, भावराव महाराज पाटील, वारकरी सेवा संस्थेचे पुरूषोत्तम वंजारी, निवृत्ती पाटील, सुरेश कोळी सर, गणेश अढाव व असंख्य भाविक उपस्थित होते. दुपारी ११ते २ तापी परिसर स्वामी समर्थ सेवा केंद्राचे वतीने ३०० सेवेकरी यांनी दुर्गा सप्तशती, मुक्ताबाई विजय ग्रंथ व अष्टकाचे पाठ व आरती केली. नविन मुक्ताबाई मंदीर येथे नऊ दिवस ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. तसेच मुक्ताई अष्टक गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. नवरात्रौत्सवात दररोज विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत.