पंढरपूर- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज वृत्तसेवा| आदिशक्ती मुक्ताई मानाचा पालखी सोहळा मुक्ताई मठ पंढरपूरात विसावलेला असताना आज त्रयोदशीला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज या बंधुराज्याकडून संत मुक्ताईच्या पादुकांना महापूजा करून साडीचोळी अर्पण करण्यात आली.
बहीण भावाचा भेट सोहळा परंपरेनुसार पुर्वी वाखरी येथे होत होता. परंतु सोहळ्याची गर्दी खूप वाढल्याने ज्ञानेश्वर महाराज संस्थान दरवर्षी त्रयोदशीला मुक्ताई मठात येऊन आई साहेबांना महापूजा, अभिषेक करून साडीचोळी भेट देतात. यावर्षी सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्त परायण योगेशजी देसाई यांनी अभिषेक महापूजा केली.
यावेळी संत सोपान काका, संस्थांनचे पालखी सोहळा प्रमुख हरिभक्त परायण, त्रिगुण महाराज गोसावी, मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, विश्वस्त शंकराव पाटील, उद्धव महाराज जुनारे, ज्ञानेश्वर हरणे व असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.