नवी दिल्ली : वृत्तसंस्था । निर्धारित वेळेत कोरोना लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि वेग वाढवण्यासाठी सर्व शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्यात लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवीन कृती कार्यक्रम हाती घेतला जात असून, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटच्या त्रिसुत्रीनंतर लसीकरणावर जोर दिला जात आहे. देशात दुसरी लाट आल्यानंतर केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्रासह काही राज्यात संक्रमणाचा वेग वाढल्यानं केंद्राने काही निर्णयही घेतले असून, त्यात लसीकरणाला वेग देण्यावर जोर देण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिथे दोन आठवड्यात लसीकरण करण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आलेल्या आहेत.