नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय रेल्वेमध्ये वेळोवेळी प्रवाशांच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. आता पुन्हा एकदा रेल्वे महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे एसी करण्याची योजना आखली आहे.
स्लीपर कोच आणि बिगर आरक्षित श्रेणीच्या डब्ब्यांना एसी कोचमध्ये बदलण्यात येणार आहे. देशभरात एसी गाड्या आणण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांना खिशावरील अतिरिक्त भाराशिवाय चांगला आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होऊ शकतो. अपग्रेड करण्यात आलेल्या स्लीपर कोचला इकॉनॉमिकल एसी ३-टायर संबोधलं जाईल.
कापूरथला येथील रेल्वे कोच तयार करणाऱ्या फॅक्टरीकडे स्लीपर कोचला एसी कोचमध्ये रुपांतरीत करण्याचा नमुना तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इकॉनॉमिकल एसी ३-टायरमध्ये ७२ बर्थच्या ऐवजी ८३ बर्थ असतील. सुरुवातीला या कोचना एसी ३-टायर टुरिस्ट क्लास असंही म्हटलं जाईल. एसी ३-टायरचं हे स्वस्तातील कोचच रुप असेल.
पहिल्या टप्प्यात याप्रकारच्या २३० डब्ब्यांची निर्मिती केली जाईल. प्रत्येक कोचला बनवायला २.८ ते ३ कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येईल. हा खर्च एसी ३-टायर बनवण्याच्या खर्चापेक्षा १० टक्के जास्त आहे. मात्र, जास्त बर्थ आणि मागणीमुळे रेल्वेला इकॉनॉमिकल एसी ३-टायरपासून चांगल्या महसुलाची अपेक्षा आहे.
बिगर आरक्षित जनरल क्लासच्या डब्यांना देखील १०० सीटच्या एसी डब्ब्यांमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी डिझाईनला अंतिम स्वरुप दिलं जात आहे. सुरुवातीच्या डिझाईनमध्ये प्रत्येक जनरल डब्यात १०५ आसनांसाठी जागा बनवली जात आहे.
दरम्यान, यूपीए-१ (२००४-२००९) या काळात इकॉनॉमिकल एसी ३-टियर क्लास डब्बे तयार करण्याबाबत योजना तयार करण्यात आली होती. तेव्हा लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘गरीब रथ’ रेल्वे गाड्या लॉन्च करण्यात आल्या होत्या. त्यांना एसी इकॉनॉमी क्लास म्हटलं गेलं होतं. यामध्ये साईड मिडल बर्थची देखील सुरुवात करण्यात आली होती. यामुळे डब्ब्यांची क्षमता आणि रेल्वेच्या तिकीटातही वाढ करण्यात आली होती. मात्र, नंतर यातून प्रवास करताना अडचण होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. तसेच यात मोठ्या प्रामाणावर गर्दी होऊ लागल्याने कालांतराने या प्रकारचे कोच बंद करण्यात आले होते.
नव्या डब्ब्यांमध्ये इलेक्ट्रिक युनिट्स दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले जातील. तसेच ब्लँकेट ठेवण्याची जागा देखील काढून टाकण्यात येईल. यामुळे डब्ब्यामध्ये जास्त जागा उपलब्ध होईल. रेल्वेने यापूर्वीच ट्रेन्समध्ये ब्लँकेट आणि अन्य सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे