मुंबई: वृत्तसंस्था । वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. आजपासून रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून राज्यात सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने कोरोना नियंत्रण रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहेत. नव्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. लॉकडाऊन नसला तरी नागरिकांना या नव्या निर्बंधांचे पालन सक्तीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नव्या गाईडलाईनमध्ये वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळून सर्व खासगी आस्थापनांसाठीही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या आस्थापनांना केवळ 50 टक्के कामगारांना घेऊनच काम करण्यास सांगितलं आहे. कर्माचारी संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आस्थापनांच्या ठिकाणी मास्कशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालयाच्या गेटवरच कर्माचाऱ्यांचे तापमान चेक करणे, सॅनिटाझर ठेवणे, आदी गोष्टींच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील. या ठिकाणी कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचं बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. घालून दिलेल्या नियमांचं हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना कोणतीही परवानगी राहणार नाही. नाट्यगृहे आणि हॉल अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरता येणार नाहीत. अशा प्रकारे कुणी कार्यक्रम केल्यास कारवाई होईल संबंधित नाट्यगृह किंवा हॉलची मालमत्ता कोरोना काळ संपेपर्यंत बंद ठेवण्यात येईल लग्नकार्यात 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.
अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी राहील. त्यापेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कारवाई करण्यात येईल. धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. शक्यतो ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात यावी. मंदिरात येणाऱ्यांनी कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळली की नाही ते पाहूनच त्यांना मंदिरात प्रवेश देणे. काही बंधनांसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल. मात्र त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल.