यावल प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथे गटारीच्या पाण्यावरून झालेल्या वादातून तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र साहेबराव पाटील (वय-३०) रा. आडगाव ता.यावल जि.जळगाव हा तरूण त्यांची आईसह वास्तव्याला आहे. गुरूवारी २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता रविंद्र पाटील हा तरूण घरी असतांना गटारीचे पाणी पास झाले आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याच्या अंगणात गेला. त्यावेळी गल्लीतील प्रविण सुरेश पाटील याने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. तर रविंद्र सुरेश चौधरी, सुरेश बाबुराव चौधरी, वैजंताबाई सुरेश चौधरी, वंदना रविंद्र चौधरी सर्व रा. आडगाव ता.यावल यांनी धाव घेवून चापटाबुक्क्यांनी मारहण केली. रविंद्र पाटील याने यावल पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून प्रविण सुरेश पाटील, रविंद्र सुरेश चौधरी, सुरेश बाबुराव चौधरी, वैजंताबाई सुरेश चौधरी, वंदना रविंद्र चौधरी सर्व रा. आडगाव ता.यावल यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र बागुल करीत आहे.