आझाद यांच्यावर काँग्रेस तोडण्याच्या कारस्थानाचा बिष्णोई यांचा आरोप

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । राज्यसभेतील नेते गुलामनबी आझाद हे विरोधी पक्षांच्या सहकार्याने काँग्रेस तोडण्याचा प्रयत्न करत आहेत,असा थेट आरोपच कुलदीप बिश्नोई यांना लावला आहे. त्यांनी आझाद यांच्यावर गांधी कुटुंबासोबत ‘गद्दारी’ केल्याचा आरोप देखील लावला.

काँग्रेसच्या सद्यस्थितीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी व्यक्त केलेल्या मतावर काँग्रेस कार्यसमितीचे विशेष आमंत्रित सदस्य कुलदीप बिश्नोई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.आझाद यांचे हे षडयंत्र काँग्रेसचे कार्यकर्ते सफल होऊ देणार नाहीत, असेही बिश्नोई म्हणाले.

कुलदीप बिश्नोई हे हरयाणा प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘आझाद यांचे वक्तव्य ऐकले. ते ऐकून फार आश्चर्य वाटले, दु:ख झाले आणि राग देखील आला. इतका ज्येष्ठ नेता अशा प्रकारची वक्तव्ये करतो, त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे.’

बिश्नोई पुढे म्हणाले की, आझाद म्हणतात की खालपासून ते वरपर्यंत निवडणुका झाल्या पाहिजेत. मी त्यांना विचारतो की, जेव्हा त्यांना जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले तेव्हा त्यांनी निवडणूक घेण्यास का सांगितले नाही? ज्यावेळी त्यांना भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले त्यावेळी ते निवडणूक घेण्याबाबत का बोलले नाहीत?

बिश्नोई पुढे आरोप लावत म्हणाले की, आझाद साहेब, विरोधकांच्या मदतीने तुम्ही काँग्रेस पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही तुमचे हे षडयंत्र सफल होऊ देणार नाही. तुमचा इतिहास काय आहे? तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात फक्त तीन निवडणुका जिंकलेल्या आहेत. ज्या गांधी कुटुंबाने तुम्हाला ५ वेळा राज्यसभेवर पाठवले, त्याच गांधी कुटुंबाविरोधात तुम्ही बोलत आहात. तुमच्यापेक्षा अधिक निवडणुका मी जिंकल्या आहेत. मी एकूण ६ निवडणुका जिंकलेल्या आहेत.

तुम्ही गांधी कुटुंबाशी गद्दारी केली आहे. इंदिरा आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. सोनिया गांधींनी काँग्रेस मजबूत करण्यासाठी अध्यक्षपद स्वीकारले. आज राहुल गांधी काँग्रेसला मजबूत बनवण्यासाठी संपूर्ण देशात फिरत आहेत. प्रियांका गांधी देखील पक्षाला मजबूत करत आहेत, असेही बिश्नोई म्हणाले

Protected Content