पुणे (वृत्तसंस्था) आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीचीही आत्महत्या पुण्यात आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. अविनाश हेमंत गोरे (69 ) आणि वैशाली हेमंत गोरे (66) अशी मृतांची नावं आहेत.
अविनाश गोरे हे एलआयसीमध्ये स्टेनो ग्राफर होते. त्यांना एक कन्या असून ती विवाहित आहे. त्या सिंहगड रोडला वास्तव्यास आहेत. त्यामुळे कर्वेनगरमध्ये ते दोघेच पती-पत्नी राहत होते. पत्नी वैशाली गोरे यांना वयोमानानुसार अनेक व्याधी होत्या. त्यांच्या आजारपणाला कंटाळून अविनाश गोरे यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर स्वत: ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पती अविनाश गोरे यांनी लिहून ठेवली आहे.