यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील अट्रावल येथील मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आज शनिवार ( ता. २५) पासून यात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे मुंजोबांच्या दर्शनासाठी पहील्याच वारला दर्शन घेणाऱ्या भाविकांची आलोट गर्दी उसळली आहे. जिल्ह्यात हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे जिल्ह्यासह राज्यातून भाविकांची मोठी गर्दी ऊसळते.
अट्रावल येथील मुंजोबा मंदिर पुरातन असून किमान तीन -साडे तिनशे वर्षापूर्वीचे असल्याचे जाणकार सांगतात. दरवर्षी माघ शुध्द प्रतिपदापासून पौर्णिमेपर्यंत दर शनिवारी व सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात असलेल्या शेतांमध्ये मान देणाऱ्या ( मानलेला नवस पूर्ण झाल्यावर तो फेडणे ) भाविकांचीही गर्दी असते. नवस फेडणारे मंदिरावर पितळी घंटा दान म्हणून देण्याची परंपरा आहे. मुंजोबास दहीभात चढवून मंदिर परिसरात वरण बट्टी व चुरम्याचा नैवेद्द दाखवितात. नवस फेडणारे मानाच्या निमित्ताने आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांना मानासाठी आमंत्रित करतात. माघ महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत येथे यात्रा असते. यात्रौत्सव काळात मुंजोबावर वाहीलेले लोणी, पूजाअर्चाचे निर्माल्य साहित्य माघ पौर्णिमेनंतर फाल्गुन पौर्णिमेपर्यंत आपोआप जळून खाक होते सा तपुडा पर्वत रांगातून एक अदृश्य ज्योत येते व मुंजोबा देवस्थानावर वाहीलेले लोणी, व इतर निर्माल्य आपोआप पेट घेते. अशी आख्यायिका आहे. नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले अट्रावल येथील स्थानिक खास या यात्रेनिमित्त अट्रावल येथे येतात. मुंजोबा यात्रौत्सवासाठी यावल एस. टी. आगारातून आठ ते दहा जादा विशेष बसेस, या मार्गावर धावतात. याशिवाय रावेर, भुसावळ, जळगाव , चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर आगारातून जादा बसेस सोडण्यात येतात. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातून येथे सुमारे साठ सत्तर हजार भाविक येत असतात. भाविकांच्या देणगीवर अवलंबून असलेल्या विश्वस्त मंडळास ईच्छा असूनही विकासात्मक कामे करता येत नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन मुंजोबा मंदिरासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी भाविक करत आहेत.
मुंजोबा देवस्थान यात्रा दिवस असे….
२५ जानेवारी, २७ जानेवारी, ०१ फेब्रुवारी, ०३ फेब्रुवारी, ०८ फेब्रुवारी
अट्रावल येथे असे जावे……
यावल येथून सहा किलोमिटर व अट्रावल-भालोद रस्त्यावर अट्रावल गावाजवळून पूर्वेस दोन किलोमिटर अंतरावर एस.टी. बसने, खासगी वाहनाने जाता येते. याशिवाय भुसावल- यावल रोडवर राजोरा फाटयावरून अट्रावल येथे जाता येते. देखभालीसाठी कोळी समाजाचे विश्वस्त मंडळ १९८३ पासून कार्यरत आहे. मुंजोबा देवस्थान समस्त कोळी पंच मंडळ विश्वस्त मंडळ पुढील प्रमाणे : अध्यक्ष ललित किटकूल कोळी , उपाध्यक्ष दीपक सोमा कोळी , खजिनदार बाबूराव दामू कोळी, सचिव भास्कर सोना कोळी , उपसचिव विक्रम ईच्छाराम कोळी , सदस्य प्रभाकर कोळी, अनिल कोळी, जनार्दन कोळी, दिनकर कोळी, बबन कोळी, जगन कोळी, कडू कोळी, सुपडू कोळी. मुंजोबाच्या यात्रेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या सोबत पोलीस उपनिरीक्षक जितेन्द्र खैरनार व पोलीस कर्मचारी यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला आहे.