जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकमेकांबद्दल गॉसिप करुन उर्जा घालविण्यापेक्षा आपण इतरांना काय देऊ शकतो, त्याचा विचार करा आणि कृतीही करा, भूतकाळ आठवण्यापेक्षा आजचा दिवस जगा, भविष्याची चिंता करण्यापेक्षा आज तुम्ही असे कार्य करा, ज्याद्वारे अन्य लोकं तुमची आठवण ठेवतील आणि तुमचा आजचा दिवस आनंदी होईल, असे आवाहन डॉ.दिलीप पटवर्धन यांनी केले.
गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.केतकी हॉलमध्ये गुरुवार, १९ जानेवारी रोजी जीवन विद्या मिशनतर्फे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.दिलीप पटवर्धन हे उपस्थीत होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे (जळगाव), कुंदा नारखेडे हे होते. सर्वप्रथम डॉ.दिलीप पटवर्धन यांचे डॉ.केतकी पाटील यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी जीवन विद्या मिशनची हे ईश्वरा… सर्वांना चांगली बुद्धी दे.. ही प्रार्थना म्हणण्यात आली. त्यानंतर डॉ.पटवर्धन यांनी रुग्णाच अर्धे दुखणे हे डॉक्टरांनी सुसंवाद साधून, हात लावून तपासून अर्थातच स्पर्श करुनच दूर होते. उपचार घेवून जातांना पेशंटचा फिडबॅक प्रत्येक डॉक्टराने घ्यावा, तीच तुमची महत्वाची संपत्ती असते. प्रत्येकाने आपल्या कामावर प्रेम करायला हवे, कामावर प्रेम केले तर थकवा, ताण येत नाही. अलीकडे नुसती पदवी असून चालत नाही तर अपडेटही राहणे गरजेचे असते. सर्वात महत्वाचे तुमच्या कामात पारदर्शकता असायला हवी, तेव्हा लोकं तुम्हाला पसंती देतात, हे सुंदर उदाहरणावरुन डॉ.पटवर्धन यांनी पटवून दिले. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालय व गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
अभिमान असावा अहंकार नको
प्रत्येक व्यक्तीला देवाने वेगळं घडवलेलं असत. आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या येतात, त्याचा निश्चितच अभिमान बाळगायला हवा मात्र अहंकारी होऊ नका, अहंकारामुळे माणसं दुरावतात. समोरच्या व्यक्तीचं नीट ऐकून घ्या, कुठलही कार्य एकट्याने होत नाही, त्यासाठी टिमवर्क महत्वाचे असते, असे विविध उदाहरणे तसेच व्हिडीओ दाखवून भावी डॉक्टरांना डॉक्टर कसा असायला हवा याबाबत डॉ.दिलीप पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.