पुणे (वृत्तसंस्था) आईच्या गर्भात असतानाच बाळाला कोरोनाची लागण झाल्याची देशासह जगातील एक दुर्मिळ घटना पुण्यात घडली आहे.
इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पुण्यातील ससून रुग्णालयात हडपसर परिसरात राहणारी एक २२ वर्षीय गर्भवती महिलेला प्रसुतीच्या एक दिवस अगोदर ताप आला. त्यानंतर महिलेची आरटी-पीसीआरद्वारे कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर अॅण्टीबॉडी टेस्ट करण्यात आली, त्यात महिलेला कोरोना असल्याचे निदान झाले. बाळाचा जन्म झाल्यानंतर तिच्या नाकातील स्वॅब घेण्यात आला. त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. बाळाला २४ ते ४८ तासाच्या आतच तापासह कोरोनाची अनेक लक्षणं दिसून आली. प्रसुतीनंतर बाळाची व्यवस्थितपणे काळजी घेण्याची गरज होती. तशी घेतली गेली. तीन आठवड्यानंतर बाळ पूर्णपणे बरे झाले. जूनमध्ये बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, असे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी बाळाला प्रसुतीनंतर करोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गर्भात असतानाच करोनाचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिली घटना आहे.