चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता यंदाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे संयोजक समितीने बैठकीत एकमताने मंजूर केले असून याबाबत तहसीलदार यांना समीतीकडून निवेदन देण्यात आले.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दि. 14 एप्रिल रोजी जयंती असल्याने बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक स्वाभिमानी जयंती उत्सव समितीची बैठक नानासाहेब बागुल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर दि.१३ व १४ एप्रिल रोजी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेऊन गर्दी होईल असा कार्यक्रम करायचा नाही असे संयोजक समितीने एकमताने ठरविले. त्यामुळे यंदाच्या जयंतीला कार्यक्रमावर बंदी असणार आहे. सदर बैठकीस कालिदास अहिरे , नगरसेवक रामचंद्र जाधव ,ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास जाधव ,गौतम जाधव ,नगरसेवक रोशन जाधव ,वंचित बहुजन आघाडीचे संभा आप्पा जाधव , युवा नेते शरद जाधव , विजय जाधव , बबलु जाधव , किरण जाधव हे प्रमुख संयोजक उपस्थित होते. सर्वांनी एकमताने सदर निर्णय घेतला असून तहसीलदार अमोल मोरे , उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे व पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड आदींना निवेदन देण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून वरील सुचनेचा पालन करावे असे समीतीने आवाहन केले आहे.