पुणे, वृत्तसंस्था | अॅसिड टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली परिसरात उघड झाला आहे. या नराधमाने लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओही तयार केला असून हा प्रकार कोणाला सांगितल्यास तो व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिली. याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर २५ वर्षीय आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. आरोपी हा विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. दररोज तो शाळेबाहेर थांबून विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. तसेच, तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकेल. तुझ्या घरच्या व्यक्तींना मारून टाकेल, अशी धमकी देत होता.
अखेर, आरोपीने तु मला एकदा भेट म्हणत जबरदस्तीने विद्यार्थिनीला वाघोली परिसरात घेऊन गेला. त्या ठिकाणी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडीओ बनविला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीचा त्रास वाढत असल्यामुळे पीडित विद्यार्थीनीने हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस अधिक तपास करत आहेत.