धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. सात जागांपैकी फक्त एक जागा भाजपाला मिळाली असून राष्ट्रवादी तीन आणि शिवसेना तीन अशी बलाबल जरी असली तरी महाविकास आघाडीच्या ताब्यात ग्रामपंचायतीचा कारभार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, धरणगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीने जास्त ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवला असल्याचा दावा केला होता. यात तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीपैकी शिवसेना ३५, महाविकास आघाडी ७ तर भाजपा ११ ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. निवडणुक जरी शांततेत पार पडल्या तरी सरपंच आणि उपसरपंच पदासाठी रस्सीखेच प्रत्यक्षात आरक्षण जाहीर झाल्यानंतरच होणार आहे. भारतीय जनता पार्टीने तालुक्यातील अहिरे बुद्रुक ही गृपग्रामपंचायत आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात भाजपाचा एकच उमेदवार जिंकून आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत सिध्द होवूच शकत नाही अशी माहिती बिनविरोध निवडून आलेले शिवसेनेचे पवन पाटील यांनी दिली आहे.