जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथील एका शिवारात सालदाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडालेली आहे.
याबाबत वृत्त असे की असोदा रेल्वेगेटजवळ असलेल्या शेतात शुक्रवारी पहाटे दरोडेखोरांनी हौदोस माजवीत एका सालदाराला मारहाण करून विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला.
पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचे असोदा रेल्वेगेटच्या पुढे शेत आहे. त्यांच्या शेतात दौलत एकनाथ काळे, वय-६५ रा.
मुक्तांगण हॉलजवळ, नेरी नाका हे अनेक वर्षांपासून सालदार म्हणून काम पाहतात. गुरुवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात आले होते. शुक्रवारी सकाळी ते घरी न आल्याने मुलाने फोन केला असता त्यांनी घेतला नाही. त्यामळे काही नातेवाईक आणि नगरसेवक प्रवीण कोल्हे, पोलीस पाटील प्रभाकर काशिनाथ पाटील यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली.
दरम्यान, शेतात शोध घेतला असता त्यांचे बूट आणि एक तुटलेला लाकडी दांडा दिसून आला. शेजारी असलेल्या विहिरीत डोकावून पाहिले असता बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले आहे. यासोबत ममुराबाद रस्त्यावर असलेल्या म्हाळसा देवी मंदिरात देखील चोरी करण्यात आली आहे.