अशोक चव्हाणांची चंद्रकांत पाटलांवर टीका

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  मानसिक संतुलन  बिघडल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे

 

सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने भाजप  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याचा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

 

मराठा आरक्षणासंदर्भात पाटील यांनी पातळी सोडून केलेल्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाण बोलत होते. भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं होतं. “अशोकराव, जे तुम्हाला जमलं नाही, त्याचं खापर तुम्हाला देवेंद्रजींच्या डोक्यावर फोडता येणार नाही. तुम्ही शासन करताय ना? मग जबाबदारी घ्या”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. “आत्ताही बॉल तुमच्याच कोर्टात आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार त्या त्या राज्याच्या मागास आयोगाने त्या राज्यातल्या एखाद्या जातीला मागास ठरवायचं. मग ते केंद्राच्या मागास आयोगाला पाठवायचं. मग त्यांनी ते राष्ट्रपतींना पाठवायचं. आणि नंतर पुन्हा कायदा राज्य सरकारनेच करायचा आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. महाराष्ट्रात मागास आयोगच नाहीये. केंद्रात आहे. गायकवाड कमिशनची मुदत संपल्यानंतर नवीन मागास आयोगाची नियुक्ती केलेली नाही. ती आधी करा”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत

Protected Content