जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील म्हसावद येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या आवारात अवैधरित २४३ ब्रास वाळूचा साठ्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर धुळे येथील ठेकेदाराला तब्बल ७० लाख ४ हजार ७१८ रूपयांचा दंडांची नोटीस जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांनी शुक्रवारी ८ जुलै रोजी दुपारी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या वाळूचा साठवणूकीचा ठेका धुळे येथील बाळासाहेब रावण भदाणे याला देण्यात आला आहे. शासकीय कामाच्या नावाखाली म्हसावद येथील जिल्हा परिषदेच्या आवारात वाळूचा मोठा साठा करून तीच वाळू जळगाव शहरात अवैधरित्या वाहतूक करत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी गुरूवार ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी व महसूल विभागाला ईमेलद्वारे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाच्या पथकासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी गुरूवारीच दुपारी २ वाजेच्या सुमारास म्हसावद येथील वाळू साठ्यावर धडक कारवाई करून २४३ ब्रास वाळू साठ्याचा पंचनामा करण्यात आला. त्यानुसार म्हसावद मंडळाधिकारी यांनी तसा अहवाल जळगाव तालुक्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांना सादर केला. त्यानुसार शुक्रवार ८ जुलै रोजी दुपारी तहसीलदार नामदेव पाटील यांनी ठेकेदार बाळासाहेब भदाणे याला अवैधरित्या २४३ ब्रास वाळूची साठवणूक केल्याप्रकरणी ७० लाख ४ हजार ७१८ रूपयांचा दंडांची नोटीस बजावली आहे.