भुसावळ, प्रतिनिधी । शासनाच्या दिशानिर्देशानुसार जे प्राणी कुर्बानीसाठी कायदेशीर वैध असतील फक्त त्याचीच कुर्बानी करावी अवैध प्राण्यांची कुर्बानी केल्यास कडक पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांनी सांगितले. ते येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात आज दि.३१ जुलै रोजी बकरी-ईद अर्थात ईदुल अजहा निमित्त कोरोना संसर्गात बकरी ईद निमित्त वैध प्राण्यांची कुर्बानी सुरक्षित पध्दतीने करण्याच्या उद्देशाने आयोजित कुरेशी समाजाच्या बैठकीत बोलत होते.
या बैठकीत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत म्हणाले की, ,काही कुरेशी व अन्य लोकांनी अवैध गुरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने गुरे व अवयव बाळगल्याचे गुन्हे दाखल झाले असून अशी वेळ येऊ नये म्हणुन सर्वांनी कायदेशीर मार्ग अवलंबावा असे सांगितले. आॅल इंडिया जमैतुल कुरेशी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष जलील कुरेशी म्हणाले की, कुर्बानीमुळे निघणा-या मटेरिअलला प्लॅस्टीक कॅरी बॅगमध्ये टाकण्यात येईल ते नगरपरिषद आरोग्य विभागाच्या ट्रॅक्टरने डंम्पींग ग्राऊंडवर घेऊन जात व्यवस्थित विल्हेवाट लावावी असे स्पष्ट केले. या बैठकीत रेहान कुरेशी ,जब्बार कुरेशी, शकील कुरेशी ,खालीद कुरेशी, साजीद कुरेशी, मेहबुब कुरेशी, सागर कुरेशी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.