अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती जप्त

 

पुणे : वृत्तसंस्था । आता ईडीने अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची जागा जप्त केली आहे. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

 

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित ईडीच्या रडारवर आहेत. मनी लाँड्रिंगप्रकरणी दोघांना ईडीने यापूर्वी समन्स पाठवला होता.  पुण्यातील सरकारी जागेवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं होतं. गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही जमीन पुण्यातील गणेशखिंड रोडवरील रेंज हिल कॉर्नरमधील प्लॉन नंबर २, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत आहे.

 

यापूर्वी परकिय चलन गैरव्यवहार प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली होती. भोसले कुटुंबीयांची पुणे, नागपूर, गोवा परिसरात तारांकित हॉटेल्स आहेत. दुबईतील एका कंपनीत भोसले यांची गुंतवणूकही आहे. भोसले यांची ईडीकडून ‘फेमा’(फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट १९९९) कायद्यान्वये सप्टेंबर २०१७ पासून चौकशी सुरू होती. भोसले यांची अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (अबिल) ही बांधकाम कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने भोसले तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात एक कोटी १५ लाख रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे. परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर  भोसले तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेली ४० कोटी ४३ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

 

भोसले यांची पुण्यातील कोरेगाव पार्क भागात हॉटेल वेस्टीन, गोव्यात हॉटेल डब्ल्यू रिट्रिट अँड स्पा, नागपूरमध्ये हॉटेल ल मेरेडियन ही तारांकित हॉटेल्स आहेत. दुबईतील रोशडेल असोसिएट्स लिमिटेड या कंपनीत भोसले कुटुंबीयांची गुंतवणूक आहे. परदेशातील बँकांमध्ये खाती आहेत. परकीय चलन व्यवहारात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने भोसले यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयातही काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती.

 

अविनाश भोसले हे बांधकाम क्षेत्रातले बडे प्रस्थ असून सुरुवातीच्या काळात ते रिक्षाचालक होते. त्यानंतर त्यांनी कृष्णा खोरे महामंडळातील कामांचे ठेके मिळविले. सर्वपक्षीय सलगी असलेल्या भोसले यांनी त्यानंतर मोठी व्यवसायवृद्धी केली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. या बळावर त्यांनी झेप घेतली.

 

Protected Content