जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शनिवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलगी ही महादेव मंदिरात गेली होता. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. दरम्यान मुलगी ही उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी चिंता व्यक्त करत तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मुलगी कुठेही मिळून न आल्याने अखेर शनिवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.