मुंबईः वृत्तसंस्था । रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना आजही मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीच्या सुटकेचा दिलासा मिळू शकला नाही. अर्णब गोस्वामी तातडीने कोणताही दिलासा देऊ शकत नाही, असं सष्ट संकेत खंडपीठाने दिले आहेत.
वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी अलिबागमधील कावीर गावातील त्यांच्या फार्महाऊसमध्ये ५ मे २०१८ रोजी आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यात बुधवारी पहाटेपासून ते अटकेत आहेत
गोस्वामी यांची तातडीने सुटका करून अंतरिम दिलासा द्यावा, या विनंतीविषयी न्या. संभाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आज न्यायालयीन कामकाजाचा दिवस नसतानाही केवळ या प्रश्नासाठी दुपारी १२ वाजता पुन्हा सुनावणी ठेवली होती. आम्ही तातडीने अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेविषयी अंतरिम आदेश देऊ शकत नाही मात्र, आरोपींना जामिनासाठी योग्य त्या कायदेशीर पर्यायांचा मार्ग उपलब्ध असल्याचा, महत्त्वाचा आदेश कोर्टाने दिला आहे.
अंतरिम सुटकेच्या दिलासा विषयीच्या अर्जावरील निर्णय न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने राखून ठेवला. अर्जावरील निर्णय लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न करू. मात्र, निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगीही घ्यावी लागेल. तरीही लवकरात लवकर जाहीर करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं स्पष्ट करतानाच कोर्टानं जामिनासाठी अन्य पर्यायही उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे.
आरोपींना कलम ४३९ अन्वये जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा आहे. या याचिकांचा त्यात कोणताही अडथळा नसेल. त्यामुळे संबंधित न्यायालय कायद्याप्रमाणे योग्य तो आदेश करू शकेल. अर्ज केल्यास संबंधित न्यायालयाने चार दिवसांच्या आत योग्य तो निर्णय द्यावा, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.