मुंबई वृत्तसंस्था । राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. शिवसेनेने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सावरकर यांच्या सन्मानाचा प्रस्ताव आणावा, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे शिवसेना यावर्षीचा अर्थसंकल्प कसा सादर करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांना सावरकर प्रिय आहेत की मुख्यमंत्रीपदाची खुर्ची प्रिय आहे, हे शिवसेनेने ठरवावे, असं सांगतानाच शिवसेनेने सावरकरांच्या सन्मानाचा प्रस्ताव अधिवेशनात मांडावा अशी मागणी भाजपने केली आहे. तर शिवसेनेनेही सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपने आधी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं. आम्हाला हिंदूत्व शिकवू नये, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला होता.
दरम्यान, ‘अथांग सावरकर’ या कार्यक्रमावरूनही वाद निर्माण झाला आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. राज्यातील महाविकास आघाडीत आल्यापासून काँग्रेसमुळे शिवसेनेला सावरकरांच्या मुद्द्यावरून दूर जावं लागत आहे. शिवसेनेचे हिंदूत्व बनावट आहे, अशी टीका भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.