अर्णब गोस्वामींचा शारीरिक छळ चालवलाय-नारायण राणे

मुंबई : वृत्तसंस्था । राज्य सरकार आणि पोलिसांनी अर्णब यांचा शारीरिक छळ चालवल्याचा आरोप खासदार नारायण राणेंनी केला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. या घटनेनंतर भाजपा नेते आणि खासदार नारायण राणेंनी संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अर्णब यांचा शारीरिक छळ चालवल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

नारायण राणेंनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर बाण चालवले आहेत. ‘अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका झाल्‍यास, त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल.’, असे ट्विट नारायण राणेंनी केलंय.

न्यायालयीन लढाई सुरू असतानाच सुरक्षेच्या कारणावरून अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात नेण्याचा निर्णय़ पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोझ शेख आणि नितेश सारडा या या प्रकरणातील अन्य आरोपींनाही तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.

Protected Content