अयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना- पंतप्रधान

modi

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिर निर्मितीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा केली. हे ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असून मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या ऑक्सिजनमध्ये, आदर्शांमध्ये आणि मर्यांदांमध्ये भगवान श्रीराम आहेत, तसेच अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपण सर्वजण जाणतोच, असे सांगत अयोध्येत भगवान श्रीकाम यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. वर्तमान आण भविष्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या आणि त्यांची श्रद्धा पाहूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्या कायद्यांतर्गत अधिग्रहण केलेली सर्व ६७ एकर जमीन श्रीराम जन्मभूमी तीर्थश्रेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, गुरूवारी सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर निर्माणाबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. माझ्या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, श्रीराम जन्मस्थळावर भव्य आणि दिव्य असे राम मंदिर उभारण्याबाबत एक विशाल योजना तयार केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, एका स्वायत्त ट्रस्ट असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची स्थापन करण्यात आली आहे. सखोल विचार करून, तसेच चर्चेअंती ५ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याची विनंतीही उत्तर प्रदेश सरकारला करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली. माझे सरकार सबका साथ, सबका विश्‍वास या मंत्रावर चालत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Protected Content