वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेत पुन्हा एकदा ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस चाचणी सुरू होणार आहे. ब्रिटनमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी सुरू असताना एका स्वयंसेवकाची प्रकृती खालावली होती. त्यानंतर ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने लस चाचणी थांबवली होती.
ऑक्सफर्ड-एस्ट्रजेनका लशीचे पहिल्या दोन टप्प्यात चांगले परिणामही दिसून आले होते. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका स्वयंसेकाची प्रकृती बिघडली होती. यामुळे कंपनीने ही लस चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला होता. स्वतंत्ररीत्या झालेल्या चाचणीत ही लस सुरक्षित आढळल्यामुळे लशीची चाचणी पुन्हा सुरू करण्यास आली. मात्र, अमेरिकेत ही स्थगिती कायम होती.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने लस चाचणीमुळे स्वंयसेवक आजारी पडला असावा, अशी शक्यता पूर्णपणे नाकारली नाही. आता अमेरिकेत चाचणी पुन्हा सुरू झाल्यानंतर कंपनीला सर्व स्वयंसेवकांवर होणाऱ्या परिणामांची माहिती द्यावी लागणार आहे.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीनेही आपली लस चाचणी थांबवली आहे. चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात एका स्वयंसेवकामध्ये एक वेगळाच आजार दिसून आला. त्यामुळे चाचणी स्थगित करण्यात आली आहे. चौकशीसाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.