मुंबई (वृत्तसंस्था) राजस्थानमधील राजकीय घडामोडी वेगात सुरु असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील चार नेत्यांसह अचानक दिल्लीला गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रातही सत्तांतर होण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत, त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्लीवारीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, मदन भोसले आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासह दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही दिल्लीत भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शहा यांच्या कानावर घालणार आहेत. तसेच या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार अस्थिर आहे आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. असाच आरोप शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही केला जात असतो. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.