अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्याला आज दुपारी आलेल्या वादळी वार्यांसह पावसाने जोरदार तडाखा दिला असून यात मोठी आर्थिक हानी झाली आहे.
अमळनेर तालुक्यात व शहरातील आज दुपारच्या सुमारास अचानक वादळी वार्यासह पावसाने सुमारे २० ते २५ मिनिटे हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी लहान मोठे वृक्ष शेतात व रस्त्यावर उलमळून पडले. वादळी वार्याचा तडाखा एवढा भयंकर होता की छतावरील पत्रे अक्षरशः हवेत शेकडो फुटांपर्यंत उडतांना दिसून आली. अमळनेर शहरात देखील कॉलनी परिसरात अनेक ठिकाणी झाडे ,फांद्या विद्युत खांबांवर पडल्याने संपूर्ण तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान, यासोबत ग्रामीण भागात देखील वादळी पावसाचे रौद्र रूप पहायला मिळाले. कळमसरेत पत्रे तर,वासरे येथे एका शेतकरी बांधवाची बैलजोडी व गाडी झाडाखाली दाबली गेली. यात बैल जखमी होऊन शेतकर्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच नीम रस्त्यावर कडुलिंबाचे झाड कोसळल्याने याठिकाणी काही काळ वाहतुक बंद झाली होती. तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात १०८ रुग्णवाहिका वरच झाड कोसळल्याची घटना घडली आहे. याच प्रमाणे तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.