अमळनेर, प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून कोरोना गेल्याच्या अविर्भावात येऊन विना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम विसरत हिंडणाऱ्या अमळनेरकरांना आजपासून शहरात फिरतांना मास्क व सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे करण्यात आले असून सदरचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश प्रांताधिकारी सीमा अहिरे व न. प.च्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी काढले आहेत.
नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकासह पोलीस विभागास सदर कारवाई बाबत सूचना केल्यानें सदर पथक आजपासून कारवाईसाठी तैनात असणार आहे. यामुळे जे नागरिक बाजारात विना मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंग न पाळताना आढळल्यास सम्बधित व्यक्ती व दुकानदार आणि विक्रेत्यास २००, ५०० याप्रमाणे दंड वसूल केला जाणार आहे. दरम्यान, अमळनेर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रभाव प्रचंड असंताना अनेक नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यापासून नागरिकांना कोरोनाचा विसरच पडला आहे. यामुळे अनेक जण मास्क विनाच बाहेर पडत असून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा तर प्रश्नच राहिलेला नाही. अमळनेरात नागरिकांनी तर कोरोनामुक्त दिवाळीच साजरी केली. शहरात एक दुकान नव्हते जिथे गर्दी दिसली नाही. बाजारात तर पायी चालणे मुश्किल झाले होते. विशेष म्हणजे गर्दीत चालताना देखील मास्क लावावेसे कुणाला वाटले नाही. चारचाकी वाहने अथवा प्रवासी वाहतुकीच्या वाहनातुन जाताना देखील कोणतेही सोशल डिस्टन्सिंग अथवा मास्कचा वापर दिसून आलेला नाही. अश्या परिस्थितीत अमळनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली असून थोडेफार बाधित रुग्ण देखील आढळू लागले आहेत. यामुळे प्रशासन अलर्ट झाले असून कदाचित यापुढे लॉकडाऊनचे निर्बंध देखील पुन्हा लादले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.