अमळनेरात ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावून केले सुरक्षित

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  अपघात घडू नयेत व मानवी जीवन वाचावे,  या उद्देशाने उपविभागीय पोलीस  अधिकारी राकेश जाधव यांच्या संकल्पनेतून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेल्या १६५ ट्रॅक्टर्स व ट्रॉल्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), जळगाव यांच्या सहकार्याने रिफ्लेक्टर लावण्यात आले.

 

 

सोमवारी बाजाराचा दिवस असल्याने बाजार समितीमध्ये मका विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून ट्रॅक्टर्स आले होते. मात्र क्वचित ट्रॉली वगळता बहुतांश ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावले नव्हते. याची दखल घेत सहज फाउंडेशनने  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगावचे मोटार वाहन निरिक्षक हेमंत सोनवणे यांना सदर बाब लक्षात आणून दिली. हेमंत सोनवणे यांनी तात्काळ कार्यतत्परता दाखवत  त्यांनी सहायक मोटार वाहन निरिक्षक तूषार शंकर मोरे, वाहतूक निरिक्षक  जे डी नाईकडा, चालक  संजय जी. रंधे या  टीमसह अमळनेर बाजार समिती गाठली आणि १६५ ट्रॅक्टर ट्रॉलींना उच्चदर्जाचे आरटीओ मान्यताप्राप्त रिफ्लेक्टर लावून दिले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, सहज फाउंडेशनचे सचिव रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.

 

बहुतांश ट्रॅक्टर ट्रॉलीला इंडिकेटर  नसतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आदळून मोठे अपघात होतात. त्या अपघातात कुणाचा तरी जीव जातो. जर ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावले तर मागून येणाजया वाहनाच्या प्रकाशझोतात ते रिफ्लेक्टर परावर्तीत होईल आणि अपघात घडण्याला आळा बसेल, पर्यायी मानवी जीवन वाचेल.

 

या संदर्भात मोटार वाहन निरिक्षक मोहन सोनवणे म्हणाले की, परिवहन आयुक्त  विवेक भिमानवार   आणि डेप्युटी आरटीओ  शाम लोही  यांच्या मार्गदर्शनांतर्गत रस्ता सुरक्षा कार्यक्रम हाती घेत असतो, अपघात कमी करून अगदी शून्यापर्यंत यावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. परंतु हे शक्य होण्यासाठी  लोकसहभाग-लोकचळवळीच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे  आणि अशीच लोकचळवळ सहज फाउंडेशन निर्माण करत आहे. असेच रस्ता सुरक्षा विषयक महत्वाचे कार्य  त्यांनी सुरु ठेवावे, आमचे  सर्वतोपरी आणि सहकार्य सहभाग त्यांना मिळत राहील.

 

तर, सहज फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश जाधव म्हणाले की, रस्ता सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. सहज फाउंडेशनकडून हा लहानसा प्रयत्न आहे. याचे अनुकरण सर्वांनी केल्यास या संकल्पनेला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास अपघात टळून नक्कीच मानवी जीवन सुरक्षित होण्यास मदत होईल.

Protected Content