अमळनेरात टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | “अनेक हिंदू मंदिरांना देणगी देणारा, सर्व धर्मांचा सन्मान करणारा,  हजारो पुस्तके असणारे ग्रंथालय निर्माण करणारा, अग्निबाणासारखे अत्याधुनिक शस्त्र निर्माण करणारा, शेतकरी कष्टकऱ्यांसाठी धरण निर्माण करू इच्छिणारा, व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देऊन इंग्रजांविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारा टिपू सुलतान हा एक सच्चा स्वातंत्र्यसैनिक होता” असे प्रतिपादन प्रमुख वक्ते संजीव सोनवणे पाटील यांनी केले.

 

हजरत टीपू सुलतान यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, बोरी नदीच्याकिनाऱ्यावर स्वातंत्र सेनानी हजरत टीपू सुलतान समितीच्या वतीने भव्य प्रबोधन कार्यक्रमात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून संजीव सोनवणे पाटील हे बोलत होते. त्यांनी यावेळी टिपू सुलतानच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करून सर्वसामान्य प्रजेच्या कल्याणासाठी कार्य करणारा सम्राट अशी टिपू सुलतानची ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या संकुचित राजकारणासाठी समाजामध्ये जातीय द्वेष पसरवणारे  केवळ टिपू सुलतानचेच नव्हे तर भारतीय संस्कृतीचे शत्रू आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.

यावेळी  मंचावर प्रमुख अतिथी मा. नगरसेवक नरेंद्र संदानशिव, शाम पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, नसीरुद्दीन हाजी साहेब, आरीफ भाया, संतोष लोहरे, अजहर नुरी मुबल्लीग आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना वक्ते प्रा.डॉ. लीलाधर पाटील यांनी टिपू सुलतानची नकारात्मक प्रतिमा ही ऐतिहासिक तथ्यांवर आधारित नसून यासाठी चुकीच्या इतिहासाचा संदर्भ कसा दिला जातो हे स्पष्ट करून देशाला मानवता वादावर आधारित राष्ट्रवादाची गरज असल्याचे सांगितले. तर सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी देशाच्या अखंडतेसाठी व एकात्मतेसाठी सर्वधर्मीय एकतेची गरज असल्याचे सांगून जगाला प्रेम अर्पावे हा या साने गुरुजींच्या भूमीचा संदेश असल्याचे स्पष्ट केले.

अध्यक्षीय मनोगतात मनियार बिरादरीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख फारुख यांनी कुराणात सांगितलेल्या दया, क्षमा व मानवतावाद या मूल्यांचे महत्त्व सांगून हाच मार्ग मानवाला प्रगतीच्या व समृद्धीच्या दिशेने नेतो असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे रागिब अहमद सर यांनी टिपू सुलतान यांच्या जीवनातील विविध प्रसंगातून एकतेचा संदेश दिला. यशस्वीतेसाठी आयोजक स्वातंत्र सैनानी हरजत टीपू सुलतान सेनेचे नविद शेख, अजहर अली, अखतर अली, अल्तमश शेख, आकीब अली, जुबेर पठाण, सलमान शेख, दानीश शेख, ईमरान खाटीक, अल्ताफ राजा, मोईज अली आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content