मुंबई, वृत्तसंस्था । .बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अखेर अभिषेकने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्याला रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
२८ दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली असून त्यांचे आभार मानले आहेत.“एक वचन हे एक वचनच असतं. आज माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं मी करोनावर मात करेन. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांची केलेल्या काळजीसाठी मनापासून धन्यवाद. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून त्यांचे आभार”, असं ट्विट अभिषेकने केलं आहे.दरम्यान, अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांनाही करोनाची लागण झाली होती. ते ११ जुलै रोजी नानावटी रुग्णालयात भरती झाली होते. मात्र अखेर बिग बींसह अभिषेकनेदेखील करोनावर मात केली आहे.