श्रीनगर । जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला व त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांना केंद्र सरकारने पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक आणि उमर अब्दुल्ला यांना ५ ऑगस्ट २०१९ रोजी नजरकैदेत ठेवले होते. उमर यांच्यावर लोकांना भडकवल्याचा आरोप केला होता. फारूक अब्दुल्ला यांना २४ मार्चला मुक्त केले होते.
उमर अब्दुल्ला यांनी आपल्यासह वडील फारुक अब्दुल्ला यांना नजरकैद केल्याचा आरोप रविवारी केला. अब्दुल्ला यांची बहीण आणि तिच्या मुलांनाही नजरकैदेत ठेवल्याचचे सांगण्यात आले. याबाबत उमर यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, ‘ऑगस्ट २०१९ पासून नवा काश्मीर उदयाला आला आहे. आम्हाला विनाकारण घरात बंद केले जाते. इतके पुरेसे होते की नाही माहीत नाही पण माझे वडील, माझी बहीण आणि तिच्या मुलांनाही घरात नजरकैदेत ठेवले आहे. हे लोकशाहीचे एक नवे मॉडेल आहे. आम्हाला कारण न सांगता घरात कैद केले जाते. आमच्या घरात काम करणाऱ्या स्टाफलाही येऊ देत नाहीत. मी यावर आक्षेप घेऊन जेव्हा राग व्यक्त करतो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटते.’
शनिवारी पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला होता. शनिवारी पीडीपीच्या नेत्या आणि मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनीही नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला होता. घरातून बाहेर पडताना अधिकाऱ्यांनी मला रोखले. कारण विचारल्यानंतर त्यांनी काहीच सांगितले नाही.