एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तेरा वर्षांपूर्वी एकात्मिक गृहनिर्माण योजना कार्यक्रमांतर्गत शहरातील बेघर लोकांसाठी पुरा भागातील बेंदी नाल्याजवळ सुमारे आठ कोटी रुपये घरकुल योजना मंजूर करण्यात आली होती परंतु ही योजना अपूर्ण अवस्थेत, धुळ खात पडली असून तिचा उपयोग फक्त अवैध धंद्यांसाठीच होत असल्याचे दिसत आहे. आ. चिमणराव पाटील यांनी या प्रकल्पाकडे जातीने लक्ष घालून शहरातील बेघर वासियांना घरे मिळवून देवून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बेघरवासीयांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशीे की एरंडोल नपातर्फे एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजना अंतर्गत शहरातील बेघर लोकांसाठी पुरे भागात बेंदी नाल्याजवळ सुमारे आठ कोटीची घरकुल योजना मंजूर करण्यात आली होती. जळगाव येथील पद्मालय कन्स्ट्रक्शनला सदर घरकुल योजनेचे काम देण्यात आले होते. त्यानुसार कामे देखील सुरू झाली होती दरम्यानच्या काळात या घरकुल प्रकल्पाविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या. बहुजन रयत परिषदेचे मोहन चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी निकृष्ट कामाविषयी जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी केल्या होत्या. कालांतराने या घरकुल योजनेची कामे बंद पडली. या योजनेचा निधी योग्य ठिकाणी खर्च न झाल्यामुळे ती अपूर्ण अवस्थेत राहिली. परिणामी घरकुल मिळण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. या घरकुल योजनेवर जळगाव घरकुल योजनेची सावली तर पडली नाही ना अशा चर्चा रंगू लागल्या. तद्नंतर शहरात डिजिटल आठवडे बाजार, वातानुकूल स्वच्छतागृहे, रस्ते अशी विविध कामे जोमाने झाली परंतु घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याचा राजकारण्यांना, शासनास विसर पडला. चालू पंचवार्षिकमध्ये आमदार चिमणराव आबा पाटील यांनी एरंडोल मतदारसंघासाठी सुमारे 100 कोटीची कामे मंजूर केली. एरंडोल शहरासाठी निधी देऊन अनेक कामे मंजूर केली. त्यात अंजनी नदीवर पुरा भाग ते शहरी भाग जोडण्यासाठी नदीवर फुलाचे काम, नपाची पाणीपुरवठा योजना, कॉलनी भागातील रस्ते, आठवडे बाजाराचे ओटे, स्मशानभूमीचे नूतनीकरण, शादी हाल अशा विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून कामांना सुरुवात केली आहे. तर काही कामे पूर्णत्वाकडे आहेत. हा कामांचा धडाका पाहून बेघर वासियांच्या अपेक्षा देखील वाढल्याने त्यांनी आमदार चिमणराव पाटलांना या घरकुल योजनेस चालना देऊन योजनेबाबत शासन दरबारी आवाज उठवून बेघर वासियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. ही योजना पूर्ण झाली तर मतदार संघाच्या विकास कामात भर पडेल असे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे, तरी आमदार चिमणराव पाटील यांनी याविषयी आवाज उठवून बेघर वासियांना न्याय मिळवून द्यावा, हक्काची घरे मिळवून द्यावी अशी मागणी केलेली आहे.